खंडणी प्रकरणातील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी
माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे अद्याप फरार
पुणे : पुण्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे आणि सराईत गुन्हेगार अमोल चव्हाण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व दीप्ती आहेर यांची बुधवारी चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
जमीन व दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे आणि सराईत गुन्हेगार अमोल चव्हाण फरार झाला असून, अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी (वय 64, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दीप्ती आहेर (वय 34, रा. व्हीला विस्टा अपार्टमेंट, बावधन), रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा. विश्वकर्मा इमारत, भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) आणि देवेंद्र फूलचंद जैन (वय, 52, प्रियदर्शनी सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, संगनमत करुन कट रचणे, धमकाविणे अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जगताप, जैन आणि आहेर हिला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. आहेर हिच्या वतीने ऍड. विजयसिह ठोंबरे यांनी बाजू मांडली. फिर्यादी यांनी उशिराने तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात खंडणीबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ही तक्रार देण्यात आली आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी करणारा अर्ज आहेर हिने न्यायालयात दिला आहे. बराटे आणि चव्हाण यांच्या विरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यात जगताप, बऱ्हाटे आणि जैन यांची काय भूमिका आहे. आहेर हिचे या सर्व आरोपींशी काय संबंध आहेत? याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. कागदापत्राबाबत देखील त्यांच्याकडून स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
या कारणांसाठी मागितली पोलिस कोठडी :
➤गुन्ह्यात जगताप, बऱ्हाटे आणि जैन यांची नेमकी काय भूमिका आहे?
➤आहेर हिने फिर्यादीकडून घेतलेले दीड लाख रुपये हस्तगत करायचे आहेत
➤ संबंधित जमीन व आहेर राहत असलेल्या फ्लॅटचे कागदपत्र जप्त करायचे आहेत
➤तपासादरम्यान उपस्थित होणाऱ्या इतर बाबींची चौकशी पोलिस आरोपींकडे करणार
➤ आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची होती मागणी