Breaking News

कोरोना संकटप्रसंगी दगडूशेठ गणपती धावला


पुणे : मानवसेवेचे महामंदिर उभारण्याकरीता सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद््भविलेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गरजू नागरिक, संस्था, रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे.

ससून रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा तब्बल ४ हजार जणांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजनसेवा, अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्स ला धान्यरुपी मदत, कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंंबांचा स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरीता ५ हजार साबणांचे वाटप आणि विनामूल्य ६ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ससून रुग्णालयात २ हजार ५०० जणांची दोन्ही वेळची भोजनाची विनामूल्य सोय ट्रस्टतर्फे करण्यात येते. सन २०१३ ला हा प्रकल्प सुरु करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या आवारात याकरीता स्वतंत्र किचनची व्यवस्था असून स्वच्छता व पोषण आहाराचे नियम अंमलात आणत भोजन तयार केले जात आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी देखील घेतली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये ५० आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट) आणि १०० आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत. तेथील रुग्ण व त्यांचे नातेवाईक मिळून १ ते १ हजार ५०० जणांची दोन्ही वेळच्या भोजनाची सोय देखील ट्रस्टतर्फे विनामूल्य केली जाणार आहे. यामुळे ससूनमध्ये येणा-या सुमारे ४ हजार गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भोजनाची विनामूल्य सोय होणार आहे.

 श्रीवत्स या अनाथ मुलांच्या संस्थेला धान्यरुपी मदत
ससून रुग्णालयाच्या आवारात कार्यरत असलेल्या अनाथ मुलांच्या श्रीवत्स संस्थेला देखील ट्रस्टने मदत दिली आहे. यामध्ये ६० किलो गहू, ५० किलो तांदूळ, १५ किलो तूरडाळ, १५ किलो मूगडाळ, १५ किलो उडीदडाळ, मीठ यांसह जीवनावश्यक वस्तू व धान्य देण्यात आले आहे. याशिवाय संस्थेतील मुलांकरीता आणखी मदत लागल्यास गरजेनुसार ट्रस्ट करणार आहे.

कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंबांना साबण
कासेवाडी वसाहतीतील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबत त्यांनी स्वच्छतेकरीता आवश्यक वस्तूंचा वापर करावा, याकरीता ट्रस्टतर्फे तब्बल ५ हजार साबणांचे वाटप वस्तीमध्ये करण्यात आले. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सामजिक कार्यकर्ते नरेश पगडाल्लू, त्या भागातील स्थानिक रहिवासी व ट्रस्टचे कर्मचारी शिवराज जगदने, अमर बोगम, अविनाश सरोदे, राहुल जावळे यांसह सहका-यांनी येथील १ हजार कुटुंबांना घरामध्ये जाऊन हे साबण दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला साबण देण्यासोबतच स्वच्छतेचे महत्त्व देखील सांगण्यात येत आहे. तसेच पोलीस बांधवांना सॅनिटायझरचे वाटप देखील ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 पुण्यामध्ये ६ विनामूल्य रुग्णवाहिका सुरु
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता ६ रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. पुणे शहराकरीता या ६ विनामूल्य रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत. तर, पुण्याबाहेर महाराष्ट्रात कोठेही जाण्याकरीता अत्यल्प खर्चात ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. सुसज्ज अशा रुग्णवाहिका  नागरिकांच्या सेवेत उपलब्ध आहेत.

जगभरातील गणेश भक्तांकरीता आॅनलाईन दर्शनाची सोय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी मंदिरात प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसल्याने आॅनलाईन दर्शन सोय करण्यात आली आहे. ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे आॅनलाईन दर्शन घ्यावे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवो, अशी प्रार्थना देखील गणरायाचरणी करावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.