शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य- महाजन
मुंबई- आज दुपारी तब्बल तीन तास किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या १२ जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक चालली. विधानभवनातील सचिवालयात ही बैठक पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आदींचे १२ जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या समितीतील सहा मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी सरकारच्या वतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीच्या आधीच आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे म्हटले होते.
मंत्रिगट समितीचे सदस्य गिरीश महाजन या बैठकीनंतर बोलताना म्हणाले, शेतकरी नेते व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांच्या १२-१३ मागण्या होत्या. त्या बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ समाधान झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.